एजन्सी, मुंबई. Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील एका शाळेत शिकणाऱ्या 4 वर्षाच्या मुलावर बस चालकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. अशातच आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच मनसैनिकांनी शाळेबाहेर आंदोलन केले आहे. यावेळी पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शाळेच्या व्हॅन चालकाने चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर केलेल्या अत्याचाराप्रकरणी शाळा प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

22 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी स्कूल व्हॅन चालकाला अटक केली आहे आणि त्याच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालकांनी शाळेबाहेर हातात फलक धरुन आज आंदोलन केलं. त्यांनी आणि मुख्याध्यापकांना काढून टाकण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. अनेक आंदोलनांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला. 

माध्यमांशी बोलताना, एका पालकाने शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांकडून या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांनी कोणतेही आश्वासन दिलेले नाही. अशी भयानक घटना पुन्हा घडणार नाही आणि आमच्या मुलांना धोका निर्माण होणार नाही याची खात्री कशी बाळगता येईल? चिंताग्रस्त पालकांनी प्रश्न उपस्थित केला.