जेएनएन, मुंबई. BMC Election 2025: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठी रणनीती आखली आहे. यावेळी पक्षात ७० टक्क्यांपर्यंत नवे चेहरे मैदानात उतरवले जाणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

या नव्या रणनीतीचा उद्देश म्हणजे पक्षात नव्या ऊर्जेला संधी देणे, तसेच जुन्या नगरसेवकांचा अनुभव व मतदारसंघातील प्रभाव टिकवून ठेवणे. पक्षाने यासाठी “नवे चेहरे, नवा जोश” हा अंतर्गत प्रचार थीम ठरवला आहे.

माहितीनुसार, माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखून त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. यामुळे जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखत नवीन नेतृत्वाला वाव मिळणार आहे. काही माजी नगरसेवक स्वतः उमेदवारी न घेता पक्षनिष्ठ आणि सक्रिय तरुण कार्यकर्त्यांना पुढे आणण्याच्या भूमिकेत आहेत.

उद्धव सेना आणि मनसेच्या संयुक्त बैठका सुरू -

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप औपचारिक युतीची घोषणा केली नसली, तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका सुरू आहेत. या बैठकींमध्ये मुंबईतील प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद, कार्यकर्त्यांचा प्रभाव आणि स्थानिक समीकरणांचा सविस्तर अभ्यास करण्यात येत आहे.

    या आधारे जागावाटपाचा आराखडा तयार केला जाणार -

    मराठी बहुल वॉर्डात उद्धवसेनेला प्राधान्य दिले जाणार आहे. तर इतर मिश्र लोकसंख्येच्या वॉर्डात मनसेला अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.