जेएनएन, मुंबई. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाचा निर्धार मेळावा मुंबईत झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा ॲनाकोंडा असा उल्लेख केला होता. त्यावर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा गरळ ओकली
उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना निराशेने घेरलेले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा गरळ ओकली आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर
इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात, आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फूत्कार काढतात, असंही ते म्हणाले.
या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं
अमित शाह देशभर फिरून संघटन उभं करतात, राजकारणाला गती देतात, 370 कलम रद्द करून इतिहास रचतात. आणि उद्धव ठाकरे मात्र घरात बसून मोदी आणि अमित शाहांवर टीका करण्याचा उद्योग करतात, असं बावनकुळे म्हणाले. या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावादी विचारांना गिळलं. 25 वर्षे मुंबई गिळंकृत केली. तो अजगर आज इतरांवर दोष देतोय, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.
उद्धव ठाकरेंकडून विवेकभ्रष्ट टीका
उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव होणार असल्याचे त्यांना चांगले ठाऊक असल्याने आता स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी ते अशी विवेकभ्रष्ट टीका करीत आहेत, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, तुमच्या या विकृत राजकारणाला खुद्द तुमचा कार्यकर्ता कंटाळला आहे. एकवेळ अशी येईल की, मागे वळून बघाल तेव्हा तुमच्यासोबत कुणीही राहणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
🟧 28 - 10 - 2025 | 📍मुंबई | माध्यमांशी संवाद
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 28, 2025
उद्धव ठाकरे स्वतःच अजगर आहेत.@BJP4India @BJP4Maharashtra #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule pic.twitter.com/kCiYh4cT9F
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते…
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाचा निर्धार मेळावा मुंबईत झाला. या मेळाव्यात मुंबईवर दोन व्यापाऱ्यांच डोळा आहे, आजच एकच येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या, भाजप कार्यालयाच भूमिपूजन आणि दुसरी बातमी राणीच्या बागेत अँनाकोंडा आणला जाणार, आज तसाच एक येऊन गेला, असे म्हणत गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.
बघतोच कशी मुंबई गिळतोस, नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नाव नाही! pic.twitter.com/1If3MHUf9b
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 28, 2025
हेही वाचा - Local Body Election: आगामी निवडणुकीत विरोधकांचा 'सुफडासाफ' करा; अमित शाहांची मुंबईत गर्जना
