मुंबई BMC Election 2026 : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपमध्ये वाढत असलेल्या अंतर्गत असंतोषाची गंभीर दखल पक्षाच्या हायकमांडने घेतली आहे. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी आणि नाराज नेत्यांना ‘थंड’ करण्यासाठी मुंबई भाजपने विशेष रणनीती आखली असून, पक्ष सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडवर असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्षांकडून संभाव्य बंडोबांची सविस्तर यादी मागवली जाणार आहे. कोणत्या प्रभागात, कोणत्या स्तरावर नाराजी आहे, तिकीट वाटपाबाबत कोण असमाधानी आहे, याचा तपशीलवार अहवाल तयार केला जात आहे. विशेषतः इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमधील नाराज गट यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश हे लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार असून, मुंबईतील प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत बंडखोरीची कारणं, प्रभागनिहाय राजकीय परिस्थिती आणि संभाव्य धोके यांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. तसेच कोणत्या ठिकाणी तातडीने हस्तक्षेप आवश्यक आहे, यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे.

माहितीनुसार, बंडखोर किंवा नाराज नेत्यांशी थेट संवाद साधण्यासाठी स्थानिक नेतृत्वांना स्पष्ट सूचना देण्यात आले आहेत. संबंधित नेत्यांच्या नाराजीमागची कारणं समजून घेऊन, तिकीट, पदे, जबाबदाऱ्या किंवा समन्वयाच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर भर दिला जाणार आहे. काही ठिकाणी ‘मनधरणी’ तर काही ठिकाणी कठोर भूमिका घेण्याची तयारीही पक्षाने केली आहे.मुंबईसारख्या महानगरात थोडीशीही अंतर्गत बंडखोरी निवडणुकीत मोठं नुकसान करू शकते. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच संभाव्य बंडोबांना नियंत्रणात ठेवण्याचा आणि संघटनात्मक एकजूट मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.