मुंबई - Bhandup Best Bus Accident: भांडुप (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ एका बसने अनेक पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. हा अपघात एका अरुंद वळणामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. बस चालकाने यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व बसने फूटपाथवरील अनेक पादचाऱ्यांना चिरडले.

अपघात कसा झाला?

कुर्ला बस अपघाताच्या बरोबर एक वर्षानंतर हा अपघात घडला, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री, बेस्ट बस चालक मार्ग क्रमांक 606 वर यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करत असताना बस एका खांबाला धडकली आणि फूटपाथवर चढली.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार या बेस्ट बस अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. प्रणिता रसम, वर्षा सावंत, मानसी गुरव आणि प्रशांत शिंदे अशी मृतांची नावे आहेत. प्रशांत लाड या जखमीला डिस्चार्ज देण्यात आला असून नऊ जणांची प्रकृती स्थिर आहे, तर अनेकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल -

सोमवारी रात्री 10:05 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. स्टेशनबाहेर मोठी गर्दी होती. विक्रोळी डेपोमधून एका कंत्राटी चालकाने चालवलेल्या वेट-लीज इलेक्ट्रिक एसी बसला हा अपघात झाला. पोलिसांनी 52 वर्षीय संतोष रमेश सावंत याला ताब्यात घेतले आहे. निष्काळजीपणा आणि बेदरकारपणे गाडी चालवल्याने मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चालक निलंबित -

    बेस्ट अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि चालकाला निलंबित केले आहे. बस चालक योग्यरित्या प्रशिक्षित होता की नाही हे तपासण्यासाठी आम्ही घटनेची चौकशी करू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे, त्यांची ओळख 45 वर्षीय मानसी गुरव, 31 वर्षीय अभिनेत्री प्रणिता रसम आणि 25 वर्षीय वर्षा सावंत अशी आहे.

    अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर

    भांडूप स्टेशनजवळ झालेला हा अपघात जवळच असलेल्या कापडाच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बस यू-टर्न घेत असताना अनियंत्रित झाली व फुटपाथवर बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांच्या गर्दीत शिरली. बसच्या धडकेत अनेकजण कोसळले आणि चाकाखाली चिरडले गेले. यात अनेकांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. बस लोकांना चिरडून पुढे जाऊन खांबाला धडकली व थांबली, असं प्रत्यक्षदर्शींनीदेखील सांगितलं.

    मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भांडूप अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केलं.मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

    या घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.  मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. असं मुख्यमंत्री फडवीसांनी म्हटलं आहे.