मुंबई -  गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (CSMIA) प्रवाशांना विमान उड्डाणांना होणाऱ्या विलंबाची माहिती देणारी अॅडव्हायजरी जारी केली आहे.

विमानतळ प्रशासनाने आपल्या  निवेदनात म्हटले आहे की, प्रतिकूल हवामान आणि मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासावी.

सोमवारी, धावपट्टीवरील दृश्यमानता कमी असल्याने विमानतळावरून नऊ उड्डाणे झाली आणि एक विमान वळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अहमदाबादहून मुंबईला जाणारे इंडिगोचे विमान 6E6468 (टेल नंबर VT-IIJ) वळवले गेले होते. खराब हवामानामुळे मुंबईत उतरता आले नाही म्हणून विमान सकाळी 10:07 वाजता उड्डाण घेऊन 11:35 वाजता सुरतमध्ये उतरले. विमानतळावर आतापर्यंत कोणताही मोठा विलंब झाल्याची नोंद झालेली नसली तरी, मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याची वर्तवण्यात आली आहे.

X वरील CSMIA च्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सुरक्षा प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी प्रवाशांना नेहमीपेक्षा लवकर विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

विमानतळावरील सूचनांव्यतिरिक्त, इंडिगोसह इतर विमान कंपन्यांनी प्रवाशांना सध्याच्या हवामान परिस्थितीमुळे होणाऱ्या संभाव्य विलंबाबद्दल माहिती दिली आहे.

सोमवारी मुंबई आणि उपनगरांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) रहिवाशांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

    सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले.

    अंधेरी सबवे आणि लोखंडवाला कॉम्प्लेक्ससारख्या काही सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

    सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून, बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी दुपारच्या सत्रासाठी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली.

    पोलिसांकडून लोकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

    आपत्कालीन परिस्थितीत किंवा अधिकृत अपडेटसाठी रहिवाशांना त्यांच्या आपत्ती नियंत्रण हेल्पलाइन १९१६ वर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

    शनिवारपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे.