जेएनएन, नवी मुंबई. Navi Mumbai Accident: मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच नवी मुंबईतील तळोजा परिसरात एक भीषण अपघात घडला आहे. तळोजा सेक्टर 10 येथे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्यावरील नागरिकांना जोरदार धडक दिली. या भीषण दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

10 जणांना कारने उडवले

प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग अधिक असल्याने चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. नियंत्रण सुटलेली कार थेट रस्त्यावरील पादचारी आणि नागरिकांच्या गर्दीत घुसली. या धडकेत सुमारे 8 ते 10 जणांना कारने उडवल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

जखमींना दाखल केले रुग्णालयात 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, काही जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, अपघातानंतर कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून, अपघाताचे नेमके कारण काय, चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, तसेच वाहनाचा वेग किती होता, याचा तपास तळोजा पोलीस करत आहेत. 

    वाहतूक विस्कळीत

    या घटनेमुळे तळोजा परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.