जेएनएन, मुंबई: महाराष्ट्रातील मल्टीप्लेक्समधील चित्रपट तिकीट दर कमी करण्याच्या मागणीसंदर्भात आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला गृहसचिव, मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर, अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर तसेच चित्रपट संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत मल्टीप्लेक्सचे तिकीट दर साधारण ₹100 ते ₹150 दरम्यान ठेवावेत, अशी मागणी पुन्हा करण्यात आली. सध्याच्या तिकीट दरामुळे सामान्य प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळत नाहीत, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचे नुकसान होत असल्याचे चित्रपट संघटनेने सांगितले आहे. 

चित्रपट पाहण्याचा आनंद वाजवी दरात मिळावा

बैठकीत झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असल्याचे अमेय खोपकर यांनी सांगितले. “सरकारकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गृहसचिवांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून लवकरच यावर ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. आमची मागणी साधी आहे, सामान्य माणसाला चित्रपट पाहण्याचा आनंद वाजवी दरात मिळायला हवा.” 

बैठकीत महेश मांजरेकर यांनी देखील चित्रपटसृष्टीसमोरील सध्याच्या अडचणींविषयी सविस्तर मांडणी केली. त्यांनी सांगितले की “चित्रपट बनवणाऱ्यांपासून ते वितरक, प्रेक्षक, सर्वच साखळीवर महागाईचा परिणाम झाला आहे. त्यामुळे तिकीट दर कमी करणे हे केवळ प्रेक्षकांसाठी नव्हे तर चित्रपट उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक आहे.”

माहितीनुसार, गृहसचिव याबाबतचा अहवाल लवकरच मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडे सादर करणार आहे. दरम्यान, मल्टीप्लेक्स असोसिएशनलाही या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात येणार आहे.