मुंबई. MPSC New Chairman: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्यानंतर त्यांच्याजागी एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या वतीने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकाराच्या मुद्यांवर विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत पुण्यात १० दिवस आंदोलन केलं होतं. राज्य सरकारनं चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आणि अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं होतं. विवेक भीमनवार रजेवर असल्यानं त्यांच्या रजेच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर व मुंबईत धडक देण्याचा इशारा दिल्यानंतर अखेर विवेक भिमनवार यांनी ट्विट करत चौकशी होईपर्यंत या पदावर न राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता या पदाचा कार्यभार कोण सांभाळणार, अशी चर्चा होत होती. मात्र आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेकडे दिला जाणार आहे.
कोण आहेत सतीश वाघोळे -
राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश वाघोळे यांचे नाव प्रभारी अध्यक्ष म्हणून प्रस्तावित केले होते. यानंतर एमपीएससी आयोगाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणात आयोगातील काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक आंदोलन केलं होते.
सतीश वाघोले एक महिन्याआधीच MPSC त दाखल-
सतीश वाघोले हे सप्टेंबर 2026 मध्येच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सदस्य म्हणून दाखल झाले होते. 7 सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनीच सतीश वाघोले यांना सदस्यपदाची शपथ दिली होती. आता एका महिन्यानंतर बदलेल्या परिस्थितीमुळं सतीश वाघोले यांच्यावर अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
