जेएनएन, मुंबई. महाविकास आघाडी, मनसे (MNS) आणि इतर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने 15 ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर त्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार), विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते होते. 

मतदार यादी दुरुस्त करत नाही तोपर्यंत 

“जोपर्यंत निवडणूक आयोग मतदार यादी दुरुस्त करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना निवडणुका घेऊ नयेत अशी विनंती करतो,” असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी आणि महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांना भेट दिल्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. 

अजून 6 महिने निवडणुका लांबल्या तरी अडचण काय

गेल्या 5 वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, अजून 6 महिने निवडणुका लांबल्या तरी अडचण काय, असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ संपत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी स्पष्ट भूमिका मांडली. 

“कोणी कोणाला काढले तेच कळत नाही,”

    “2024 च्या निवडणुका व्हायच्या आधी आणि नंतर अशा दोन याद्या राज ठाकरे यांनी यावेळी दाखवल्या. 2024 मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यातील तपशील सांगतो. त्यामुळे यादीत काय प्रकारचा घोळ आहे, ते समजेल. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व नाव धनश्री कदम, वय-23, वडिलांचे नाव दीपक कदम, वय-117, मतदारसंघ 161 चारकोप, नंदिनी चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय-124, महेंद्र चव्हाण यांच्या वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय 43 कोणी कोणाला काढले तेच कळत नाही,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.

    हेही वाचा - Maharashtra Politics: ‘तोपर्यंत निवडणुका घेऊ नका’; उद्धव-राज ठाकरे यांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

    राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे….

    • निवडणूक आयोग केवळ निवडणूक घेतात आणि राजकीय पक्ष निवडणूका लढवतात, मग राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर पहिला घोळ इथे आहे
    • 2024 साली ज्या निवडणुका झाल्या त्याआधीच्या यादीत मुलांच्या वयापेक्षा वडिलांचे वय कमी कसे?
    • 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या मतदारयादीत अनेक मतदारांची नावं आहेत मात्र फोटो नाहीत. 
    • राज्य निवडणूक आयेगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगावर ढकलली. 
    • जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये पूर्णपणे सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका अशी मागणी आम्ही निवडणुक आयोगाकडे केली आहे. त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतं ते पाहू आणि आम्ही पुढचा निर्णय घेऊ.
    • जेव्हा खोट्या यादीची बातमी माध्यमांवर येते नंतर संबंधित नावं मतदार यादीतून गायब होतात त्याबद्दल निवडणूक आयोगाला माहिती नाही. जी नावं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून गायब झाली त्याची माहिती आयोगाकडे नसेल तर ती नावं कोण काढतंय आणि नवी नावं कोण टाकतंय याचा तपास करावा लागेल.
    • आपण कोणाला मतदान करतो हे गोपनिय असतं…  मतदार कसे गोपनीय असतील? मतदान केंद्रावर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज निवडणूक आयोग बघू शकतं मग आम्ही का नाही बघू शकत?
    • या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणूक आयोग लपाछपी का करतंय हेच मला कळत नाहीये. 
    • 2022 च्या यादीत जाहीर केलेल्या यादीमध्ये मतदारांचे फोटो आहेत, मग आत्ता जाहीर केलेल्या यादीतून मतदारांचे फोटो का काढून टाकले? हा घोळ निवडणूक आयोग का करतंय? 
    • या देशातील ही पहिली निवडणूक नाही, याआधीच्या कोणत्याही निवडणूकीच्या वेळेस असे मुद्दे आले नाहीत मग, हे या निवडणूकीच्या वेळीच का आले?
    • निवडणूक यादीत घोळ आहेत, ते घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठेवलेले आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही करून घोळ सोडवावेत इतकीच आमची इच्छा आहे.
    • या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 232 जागा निवडून आल्या तरीही महाराष्ट्रात शांतता होती. कोणीही जल्लोष केला नाही हे कसलं द्योतक आहे?
    • 2019 साली याच विषयावर मी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळीही राज्यातील सर्व विरोधी पक्षांचे नेते पत्रकार परिषदेत सहभागी होते.

    हेही वाचा - Maharashtra Crime News: रत्नागिरीत गुरुकुलमध्ये मुख्याध्यापकाचा विद्यार्थीनीवर वारंवार अत्याचार, बाबाला अटक