जेएनएन, मुंबई:महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रज्ञा सातव यांच्यासोबत काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचाही भाजपात प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.

यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली असून, विधान परिषदेतील काँग्रेसच्या ताकदीला मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, विधान परिषदेच्या आणखी एका आमदाराच्या पक्षप्रवेशाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. या पक्षप्रवेशमुळे काँग्रेसचे विधान परिषदेतील संख्याबळ लक्षणीयरीत्या घटणार आहे. या परिस्थितीत काँग्रेसच्या विधान परिषदेतील संभाव्य विरोधी पक्षनेतेपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आवश्यक संख्याबळ नसल्यास काँग्रेसला हे पद मिळणार की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधीच काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

भाजपकडून आज राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे. पुणे आणि सोलापूर येथील काही महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारीही आज भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे भाजप आपली संघटनात्मक ताकद वाढवत असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप आक्रमक रणनीती आखत असल्याचे चित्र आहे.

एकीकडे काँग्रेसमधून गळती सुरू असताना, दुसरीकडे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाल्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. आज होणाऱ्या या पक्षप्रवेशांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमका काय बदल होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा: मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत जाणार;काँग्रेसचा काय होणार