ठाणे. संपूर्ण देशभरात नवरात्री उत्सवाचाी धूम पाहायला मिळत आहे. त्यातच भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दांडिया खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील 'लोटस नवरात्री महोत्सवा'त हा प्रकार घडला. त्याला तातडीने तुंगा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका हेच तरुणाच्या मृत्यूचं कारण असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मीत रुपडा असे या मृृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. भाईंदर येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा खेळत असताना मीतला हृदयविकाराचा झटका आला व तो खाली कोसळला. मीत हा भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्लीतील पूनम अपार्टमेंटमध्ये आई-वडिलांसह राहत होता. रविवारी रात्री तो भाईंदर पश्चिम येथील लोटस नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी गेला होता. दांडिया खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर तो खाली कोसळला. त्याला तातडीने भाईंदर येथील तुंगा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मीतची प्रकृती होती ठणठणीत -
धक्कादायक म्हणजे त्यांच्या चुलत भावाने सांगितलं की, मीत पूर्णपणे निरोगी होते आणि त्यांना कोणताही आजार नव्हता. मीतच्या अकस्मात निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मीत पेशाने ते पेशाने रिअल इस्टेट व्यावसायिक होता.
मीतचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनलकर यांनी दिली. मीतच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांसह निकटवर्तींयांना मोठा धक्का बसला आहे.
