जेएनएन, मुंबई: वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय झाल्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा विजयादशमी हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे. मात्र, महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीत दसऱ्याचा आनंद साजरा करण्यासारखी स्थिती आहे का, असा सवाल उपस्थित करत ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला लक्ष्य केले आहे.

‘पांडवांनी कौरवांचा नाश करण्यासाठी शस्त्रपूजा केली. पण महाराष्ट्रात कौरवांच्याच हाती शस्त्रे आहेत आणि ते सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून हत्या घडवत आहेत,,अशा शब्दांत ठाकरे गटाने राज्यातील हिंसक घटनांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

दसऱ्याच्या परंपरांचा दाखला देत सरकारवर टीका 

विजयादशमीचा सण विविध पौराणिक कथांशी जोडलेला आहे. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतामातेला मुक्त केले आणि अधर्मावर धर्माचा विजय मिळवला, अशी रामायणातील कथा आहे. त्यामुळे रावणदहन करून दसरा साजरा करण्याची परंपरा रूढ झाली. त्याचप्रमाणे, देवी दुर्गेने नऊ दिवसांच्या युद्धानंतर दशमीच्या दिवशी महिषासुराचा वध केला, अशी धार्मिक मान्यता आहे. ही कथा स्त्रीशक्तीच्या विजयाचे प्रतीक मानली जाते. 

महाभारतानुसार, अज्ञातवासाला जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. अज्ञातवास संपल्यानंतर विजयादशमीच्या दिवशी त्यांनी ही शस्त्रे पुन्हा धारण केली. या परंपरेतून दसऱ्याला शस्त्रपूजा करण्याची प्रथा प्रचलित झाली. या सर्व कथांमध्ये अन्याय, अधर्म आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा संदेश असल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. 

‘आज आनंद साजरा करण्यासारखी परिस्थिती आहे का?’

    दसऱ्याच्या या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा संदर्भ देत ठाकरे गटाने महाराष्ट्रासह देशातील सद्यस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामायण, देवी दुर्गेची कथा आणि महाभारत या तिन्ही कथांमध्ये विजयाचा आनंद साजरा करण्याची कारणे आहेत.मात्र आज महाराष्ट्रात, भारतात तशी परिस्थिती आहे का, असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. 

    राज्यातील गुन्हेगारी, गोळीबार आणि सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या हिंसक घटनांचा संदर्भ देत सरकारच्या कारभारावर टीका करण्यात आली आहे. दसरा हा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा सण असताना, समाजात हिंसा आणि गुन्हेगारीच्या घटना घडत असतील, तर या सणाच्या संदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत आहे का, असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. 

    ‘महाराष्ट्रात कौरवांच्याच हाती शस्त्रे’ 

    अग्रलेखातील सर्वाधिक लक्षवेधी टीका शस्त्रपूजेच्या परंपरेच्या संदर्भातून करण्यात आली आहे. पांडवांनी कौरवांचा पराभव करण्यासाठी शस्त्रे धारण केली होती. परंतु महाराष्ट्रात कौरवांच्याच हाती शस्त्रे असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान लेखातून ठाकरे गटाने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर हल्लाबोल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून हत्या घडवण्याच्या घटनांचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांच्या काळातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 

    या टीकेतून राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोळीबारासारख्या घटना घडत असतील, तर कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याची भूमिका अग्रलेखातून मांडण्यात आली आहे.