एजन्सी, मुंबई. Nitesh Rane on Board Exam: पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची मागणी मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून केली आहे. या पत्रात त्यांनी कॉपी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

गैरप्रकार होऊ शकतात 

परीक्षा हॉलमध्ये मुलींना बुरखा घालण्याची परवानगी दिल्याने गैरप्रकार होऊ शकतात आणि सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होऊ शकतात, असं त्यांनी दादा भुसे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना बुरखा घालण्याची परवानगी देऊ नये

10 वी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बुरखा घालण्याची परवानगी देऊ नये. आवश्यक असल्यास, तपासणी करण्यासाठी महिला पोलिस अधिकारी किंवा महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्या पारदर्शकपणे, फसवणूक सारख्या कोणत्याही गैरप्रकारांपासून मुक्तपणे घेतल्या पाहिजेत, अशी Nitesh Rane यांनी पत्रात मागणी केली आहे.

    अनेक विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो

    जर परीक्षार्थ्यांना बुरखा घालण्याची परवानगी दिली गेली तर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा इतर माध्यमांचा वापर फसवणूक करण्यासाठी केला जात आहे की नाही हे ठरवणे कठीण होईल. कोणतीही अनुचित घटना घडल्यास, त्यामुळे सामाजिक आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो, असं नितेश राणे यांनी पत्रात म्हटलं आहे.

    10 वी, 12 वी च्या परीक्षा

    शालेय शिक्षण मंत्रालयाने त्यांच्या मागणीला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्र माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारीपासून होणार आहे. 12 वीची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.