मुंबई. Siddheshwar Express robbery : सोलापूरहून मुंबईला प्रवास करणाऱ्या एका व्यावसायिकाला अचानक ट्रेनमध्ये झोप लागली. थोड्याशा झोपेनंतर तो जागा झाला तेव्हा त्याचे कोट्यवधी रुपयांचे दागिने गायब असल्याचे पाहून त्याला धक्का बसला.या घटनेने संपूर्ण ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली.
ही घटना सिद्धेश्वर एक्सप्रेस ट्रेनमध्ये (Siddheshwar Express) घडली. मुंबईतील एका व्यावसायिकाने 6 डिसेंबरच्या रात्री सोलापूरहून ट्रेन पकडली. मात्र, मुंबईत येण्यापूर्वीच त्याचे सर्व दागिने चोरीला गेले. दागिन्यांची किंमत ₹5.53 कोटी असल्याचा अंदाज आहे.
चोरी कशी झाली?
कल्याणमधील जीआरपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाकडे 4,456 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेल्या दोन ट्रॉली बॅगा होत्या. त्याने त्या बॅगा त्याच्या सीटखाली ठेवल्या होत्या आणि त्या साखळीने बांधल्या होत्या. रात्री तो झोपी गेला तेव्हा चोराने साखळी तोडली, ट्रॉली बॅगा घेतल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सोलापूर आणि कल्याण (ठाणे) दरम्यान घडली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला-
थोड्या वेळाने जेव्हा व्यापाऱ्याला जाग आली तेव्हा त्याला बॅगा गायब असल्याचे लक्षात आले. त्याने ताबडतोब पोलिसांकडे चोरीची तक्रार केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 305 (C) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण जीआरपीचे वरिष्ठ अधिकारी पंढरी कांदे म्हणाले, आम्ही एफआयआर नोंदवला आहे. चोराने व्यावसायिकाच्या झोपेचा फायदा घेतला आणि सर्व सोन्याचे दागिने पळवून नेले. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत.
