मुंबई. mumbai local train : आज सकाळी मध्य रेल्वेच्या सेवेत मोठा अडथळा निर्माण झाला. वांगणी–बदलापूरदरम्यान एका लोकलमध्ये अग्निरोधक (Fire Detection) यंत्रणा सक्रिय झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. सुरक्षा नियमांनुसार ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली आणि तपासणी सुरू करण्यात आली. या घटनेचा मोठा फटका कर्जतकडे जाणाऱ्या लोकल प्रवाशांना बसला आहे.
नेमकं काय घडलं?
सकाळच्या गर्दीच्या वेळेत वांगणी-बदलापूरदरम्यान धावणाऱ्या एका लोकलमध्ये अचानक धूर किंवा उष्णतेचा संकेत मिळाल्याने अग्निरोधक प्रणाली सक्रिय झाली. त्यानंतर लोकल तत्काळ थांबवण्यात आली. तांत्रिक कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.डब्यांची व प्रणालीची तपासणी करण्यात आली.प्राथमिक माहितीनुसार प्रत्यक्षात आग लागली नसली तरी सिस्टममध्ये तांत्रिक बिघाडामुळे अलार्म वॉर्निंग मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकल वाहतूक ठप्प -
या तपासणीमुळे कर्जतकडे जाणाऱ्या तसेच कर्जतहून येणाऱ्या अनेक लोकल गाड्या रखडल्या. प्रवाशांना 20 ते 30 मिनिटे उशीर प्रवास सुरू करावा लागला. प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी वाढली होती. दरम्यान गाड्यांचे वेळापत्रक बिघडल्याने ऑफिस, कॉलेजमध्ये व इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण झाला.
रेल्वेची तातडीची कारवाई!
मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने टेक्निकल टीम पाठवली, परिसरातील निरीक्षण वाढवले, इतर गाड्यांची वाहतूक सिंगल लाइनवरून तात्पुरती वळवली, अतिरिक्त घोषणा करून प्रवाशांना माहिती दिली
प्रवाशांचे हाल!
अचानक थांबलेल्या लोकलमूळे गर्दी, घुसमट आणि अनिश्चितता या कारणांमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कळवा व कर्जत या भागातील प्रवाशांवर सर्वाधिक परिणाम झाला.
परिस्थिती हळूहळू सुरळीत-
तपासणी पूर्ण झाल्यानंतर हळूहळू ट्रॅफिक सुरू करण्यात आला आहे. मात्र सकाळच्या वेळापत्रकातील विस्कळीतपणा दिवसभर परिणाम करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
