जेएनएन, मुंबई> मुंबईतील दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानाच्या देखभालीची जबाबदारी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (MCA) देण्याची मागणी पुढे आली आहे. मैदानाचा विकास, देखभाल आणि व्यवस्थापन स्वतःच्या खर्चाने करण्याची तयारी MCA ने दर्शवली असून, यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे परवानगी मागण्यात आली आहे.
शिवाजी पार्क हे केवळ मुंबईतील एक मोठे मैदान नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि क्रीडा इतिहासाचे साक्षीदार आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात या मैदानाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटू याच मैदानावर घडले असून, आजही मुंबईतील क्रिकेट संस्कृतीचे केंद्र म्हणून शिवाजी पार्ककडे पाहिले जाते.
MCA ने महापालिकेला पाठविलेल्या पत्रात मैदानाच्या देखभालीचा खर्च स्वतः उचलण्याची तयारी दर्शवली आहे. मैदानाची ऐतिहासिक ओळख कायम ठेवत त्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हे मैदान अधिक सक्षम करणे, हा या प्रस्तावामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
आचरेकर गुरुजींचे मैदान
दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे शिवाजी पार्कशी विशेष नाते होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नामवंत क्रिकेटपटू घडले. भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी याच मैदानावर क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतले आणि पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला.
शिवाजी पार्कच्या मैदानावर आजही सकाळ-संध्याकाळ क्रिकेटचे सराव शिबिर आणि सामने सुरू असतात. त्यामुळे या मैदानाची योग्य देखभाल आणि संरक्षण होणे आवश्यक असल्याची भूमिका क्रीडा क्षेत्रातूनही व्यक्त केली जात आहे.
महापालिकेचा निर्णय महत्त्वाचा
MCA ने मैदानाच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली असली तरी शिवाजी पार्क हे मुंबई महापालिकेच्या मालकीचे सार्वजनिक मैदान आहे. त्यामुळे मैदानाची जबाबदारी MCA कडे देण्याबाबत अंतिम निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार आहे. मैदानाच्या व्यवस्थापनासाठी MCA ला कितपत अधिकार दिले जातील, तसेच सर्वसामान्य नागरिकांचा मैदानावरील मुक्त प्रवेश आणि इतर खेळांसाठी उपलब्धता कायम राहणार का, याबाबतही प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
मुंबईतील अनेक मोकळी मैदाने अतिक्रमण, अपुरी देखभाल आणि खासगी वापराच्या आरोपांमुळे चर्चेत असताना शिवाजी पार्कच्या व्यवस्थापनाबाबतचा हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. आता ऐतिहासिक ओळख जपत शिवाजी पार्कच्या देखभालीची जबाबदारी MCAकडे दिली जाणार का, याकडे मुंबईकरांसह क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
