नवी मुंबई. Navi Mumbai Fire : संपूर्ण देशभरात दिवाळीची धामधून सुरू असतानाच नवी मुंबईतून अग्निकांडाच्या दोन घटना समोर आल्या आहेत. मुंबई, नवी मुंबईसह उपनगरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कामोठ्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात माय-लेकीचा मृत्यू झाल्यानंतर वाशी येथील सेक्टर 14 मधील 'रहेजा रेसिडेन्सी' या निवासी संकुलात आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत 6 वर्षांच्या चिमुकलीसह 4 जणांचा मृत्यू होरपळून मृत्यू झाला आहे. या आग्निकांडात 10 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, वेदिका सुंदर बालकृष्णन (6), कमला हिरालाल जैन (84), सुंदर बालकृष्णन (44), पूजा राजन (39) अशी मृतांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री 12.40 च्या सुमारास वाशीतील सेक्टर 14 मधील एम जी कॅाम्लेक्स रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये आग लागली. या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आगी लागली व ती 11 व्या व 12 व्या मजल्यावर पसरली. या आगीने भीषण स्वरुप धारण केल्याने वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या कमला जैन यांचा तर 12 व्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटूंबातील आई, वडील आणि 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात वाशी अग्निशमन विभागाने यश मिळवले आहे.
या इमारतीतून 10 ते 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या 10 हून अधिक लोकांना तातडीने फोर्टिस हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Navi Mumbai, Maharashtra: Massive fire breaks out at Ambe Shraddha Society in Kamothe Sector 36 on Monday night. Mother and daughter killed, three others rescued in time. Short circuit suspected as cause; investigation underway. pic.twitter.com/LIR0MgfDrc
— IANS (@ians_india) October 21, 2025
कामोठेमध्ये माय-लेकीचा मृत्यू-
नवी मुंबईतील कामोठे येथे एका सोसायटीत लागलेल्या आगीत मायलेकीचा मृत्यू झाला. इमारतीमधील सर्वजण बाहेर पडले मात्र आगीमुळे दोघांना बाहेर पडता आलं नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं आणि नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं.
कामोठे सेक्टर 36 मधील अंबे श्रध्दा सहकारी सोसायटीत घरात झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली. या आगीत आई आणि मुलीचा होरपळून मृत्यू झाला. सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील रुम क्रमांक 301 मध्ये दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली आणि भडका उडाला. घरात असलेल्या आई आणि मुलीला आगीच्या झळांमुळे बाहेर पडता आले नाही व त्यांचा आतच मृत्यू झाला.