जेएनएन, मुंबई: येत्या 1 मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. यावर काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचं असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे, असा ठाम आग्रह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

 ऑटो आणि टॅक्सी परवानासाठी मराठी भाषा आवश्यक आहे. तर स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि ग्राहकांशी सुसंवाद राखण्यासाठी व्यापाऱ्यांना मराठी भाषा येणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

मराठी बोलता येणं गरजेचं

सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र ही मराठी भाषिकांची भूमी आहे आणि येथे व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने स्थानिक संस्कृती व भाषेचा आदर केला पाहिजे. “ग्राहकांशी योग्य संवाद साधायचा असेल, तर मराठी बोलता येणं गरजेचं आहे. त्यामुळे व्यवसायालाही फायदा होतो आणि ग्राहकांचा विश्वासही वाढतो,” असे त्यांनी नमूद केले.

रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा

याचबरोबर, अलीकडच्या काही आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलकांनाही संदेश दिला. “प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा संबंधित घटकांनी एकत्र बसून चर्चा करावी. संवादातून मार्ग निघू शकतो,” असे आवाहन त्यांनी केले. 

    व्यापारी आणि स्थानिक संघटनांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी समन्वय साधण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, सरकार कोणत्याही प्रकारच्या बळजबरीला पाठिंबा देत नाही, मात्र स्थानिक भाषेला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.

    या भूमिकेमुळे राज्यातील व्यावसायिक धोरण आणि स्थानिक भाषा यावर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही व्यापारी संघटनांनी या भूमिकेचं स्वागत केलं असून, तर काहींनी यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.