Riteish-Genelia Deshmukh ST Brand Ambassador: ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला आता नवं ग्लॅमर मिळणार आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची एसटी महामंडळाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणजे सदिच्छा दूत (MSRTC Brand Ambassador)म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा आज, 22 एप्रिल 2026 रोजी मंत्रालयात पार पडला. हा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक येत्या दोन दिवसांत रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबत अधिकृत करार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा करार पाच वर्षांसाठी असणार असून, या काळात दोघेही एसटीच्या विविध जाहिराती, प्रचार मोहिमा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतील. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांपर्यंत एसटीची सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय.

एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती मोहिमांना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे, तसेच परिवहन खात्याच्या ‘ रस्ता सुरक्षा अभियाना 'ची जनजागृती अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेषतः रस्ता सुरक्षा, प्रवासी जनजागृती आणि सामाजिक संदेशांच्या प्रसारासाठी या दोन्ही कलाकारांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

MSRTC ने 2023 मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती, परंतु ते या सार्वजनिक वाहतूक संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसले. दोन दशकांपूर्वी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले हे या महामंडळाचे ब्रँड ॲम्बेसेडर होते.

    MSRTC हे देशातील सर्वात मोठे रस्ते वाहतूक महामंडळ असून, त्यांच्याकडे 16,000 हून अधिक बसेसचा ताफा आणि 86,000 कर्मचारी आहेत. दररोज 55 लाखांहून अधिक प्रवासी एमएसआरटीसीच्या बसेसमधून प्रवास करतात.