जेएनएन, मुंबई. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजातील आवाज बुलंद करण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उद्यापासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणला बसणार आहेत. आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
मैदानावर स्वयंसेवक सक्रिय
या आंदोलनाला संपूर्ण राज्यभरातून मराठा बांधवांची उपस्थिती अपेक्षित आहे. आंदोलकांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या मुक्कामाच्या सोयीसाठी मैदानावर स्वयंसेवक सक्रिय झाले आहेत. मराठा समाजातील महिला, युवक तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आझाद मैदान गाठत आहेत.
कायदा व सुव्यवस्थासाठी हमीपत्र!
आंदोलन शांततेत आणि लोकशाही मार्गाने व्हावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला हमीपत्र दिले आहे. या पत्रावर स्वतः त्यांच्या स्वाक्षरी असून, आंदोलनादरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही याची हमी दिली आहे. तसेच शासनाविरोधात निदर्शने केली जाणार असली तरी हिंसक प्रकार घडणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांचा अलर्ट!
आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांची संख्या वाढत असल्याने मुंबई पोलिसांनी विशेष सुरक्षा योजना आखली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागालाही विशेष सूचना देण्यात आले आहे.
सरकारकडून चर्चेची अपेक्षा!
दरम्यान, जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारला चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे.