मुंबई. Manoj jarange patil on kunbi certificates: मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींची कुणबी जातप्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारने जाणीवपूर्वक आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट रचल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच कुणबी जातप्रमाणपत्रे अवैध ठरवण्याचे आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

मनोज जरांगे म्हणाले, सरकारने मला एकटं पाडण्याचा आणि मराठा समाजाचा लढा कमकुवत करण्याचा नियोजित कट रचला आहे. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. फडणवीस सरकार आणि काही मंत्र्यांनी मराठ्यांविरोधात कट रचला असून तो योग्य वेळी समाजासमोर उघड करणार आहे.

जरांगे यांनी पुढे आरोप केला की, मराठा समाजाचे कुणबी नोंदी शोधून त्यांना प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र आता त्याच प्रमाणपत्रांना जात पडताळणी समितीकडून अवैध ठरवले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाची दिशाभूल होत असून शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाच्या संधी हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी भाजपमधील मराठा नेत्यांनाही लक्ष्य केले. “तुम्ही ज्या पक्षाला वाढवत आहात, त्याच पक्षात तुमची मुलं काम करत आहेत. पण त्याच पक्षाकडून मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम सुरू आहे. हा नियोजित कट आहे आणि तो मी सिद्ध करून दाखवणार, असे ते म्हणाले.

2029  मध्ये बदल घडवणार -

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट आरोप करताना जरांगे म्हणाले, “कुणबी जातप्रमाणपत्रे अवैध ठरवण्यामागे बावनकुळे यांचे आदेश आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.”यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांबाबतही आक्रमक भूमिका मांडली. “2029 मध्ये तुम्ही आयुष्यात पाहिला नसेल इतका मोठा बदल मराठा समाज घडवेल.  समाजाशी विश्वासघात करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल,” असा इशारा त्यांनी दिला.

    मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींची कुणबी जातप्रमाणपत्रे अवैध ठरल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.