जेएनएन, मुंबई - Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची महत्वाकांक्षी  मुख्यमंत्री  ‘लाडकी बहीण’ योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. पात्रता नसतानाही अनेक महिला सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता थेट या लाभार्थ्यांवर कारवाई होणार असल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

महिला व बालविकास विभागाने एक विशेष तपासणी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये तब्बल 1183 महिला अधिकारी व कर्मचारी यांची नावे समोर आली आहेत. या सर्वांनी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आर्थिक मदत घेतली आहे. या महिला पात्र नसल्याचे सिद्ध झाले आहे. महिला बाल कल्याण विभागाने ही यादी संबंधित विभागांना सुपूर्द केली आहे. पुढील काही दिवसांत प्रत्येक जिल्हा परिषदेतून या अपात्र महिलांवर कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे.

लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी राबवण्यात येत आहे. मात्र शासकीय सेवेत कार्यरत महिलांनीही चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाकडून कडक पावलं उचलली जात आहेत. 

महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पात्रता तपासणी प्रक्रिया जिल्हा स्तरावर करण्यात आली आहे. गैरप्रकार उघड झाल्यानंतर नावे थेट विभागांना कळवण्यात आली आहेत. कारवाईत मिळालेला आर्थिक लाभ वसूल करण्यात येईल. तसेच, आवश्यकतेनुसार शिस्तभंगात्मक कारवाई होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.