मुंबई. Vande Bharat Train Accident: मुंबई–कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला. रेल्वे रुळांवर आलेल्या म्हशींच्या कळपाला वंदे भारत ट्रेनने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे मुंबई–कोकण मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती.

माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस वेगात असताना अचानक रुळांवर म्हशींचा कळप आल्याने लोको पायलटला ब्रेक लावण्यास वेळ मिळाला नाही. ट्रेनने म्हशींना जोरदार धडक दिली. या अपघातात काही म्हशींचा मृत्यू झाला असून ट्रेनच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे.

अपघातानंतर तातडीने रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याची माहिती नाही.

अपघातामुळे संबंधित रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली होती. रुळांवरील मृत म्हशी हटवणे, तसेच ट्रेनची तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती करण्यास काही वेळ लागल्याने रेल्वे वाहतूक जवळपास तीन तास विस्कळीत झाली.

रेल्वे प्रशासनाने आवश्यक दुरुस्ती व सुरक्षिततेची खात्री केल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे रुळांच्या आसपास जनावरे येऊ नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून उपाययोजना करण्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आहेत.