जेएनएन, मुंबई: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि ‘महायुती’तील घटक पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्रपणे, याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
निर्णय स्थानिक पातळीवर होणार
पूर्व विदर्भाच्या बैठकीनंतर फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “कोणत्या ठिकाणी महायुतीसोबत लढायचं आणि कुठे स्वतंत्रपणे उमेदवारी द्यायची, हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाणार आहे .
स्थानिक निर्णयाला प्राधान्य
भाजपने यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. युतीबाबतचा निर्णय प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार घ्यावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
महायुतीला यश मिळणार
फडणवीस यांनी सांगितलं की, “महायुती ही राज्याच्या विकासासाठी एकत्र आली आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये देखील आम्ही चांगलं यश मिळवू, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.” राज्यभरात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम करून मतदारांपर्यंत पोहोचावं, असं त्यांनी आवाहन केलं.
मित्रपक्षांवर टीका नको
फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सूचनाही दिले आहे की, जर भाजपने एखाद्या ठिकाणी एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला, तरी महायुतीतील मित्रपक्षांविरुद्ध टीका करू नये. त्याऐवजी, शक्य तिथे युती टिकवण्यासाठी संवाद आणि समन्वय साधण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.