जेएनएन, मुंबई. Mahayuti Government 100-Day Report Card: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्यांच्या सरकाराने 100 दिवसांत केलेल्या कामांचा आढावा घेणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या 48 विभागांपैकी 12 विभागांनी 100 दिवसांच्या अहवाल कार्डमध्ये परिपूर्ण 100 गुण मिळवले आहेत. 

100 टक्के उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्या विभागांमध्ये जलसंपदा, गृह, ग्रामीण विकास, पशुसंवर्धन, बंदरे, उच्च आणि तांत्रिक शिक्षण, कामगार, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक व्यवहार, खाणकाम, दुग्ध विकास आणि रोजगार हमी योजना यांचा समावेश आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर फडणवीस यांनी प्रत्येक विभागासाठी 100 दिवसांचा कार्यक्रम निश्चित केला होता आणि त्यात महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली होती. 

100 दिवसांच्या कालावधीत इतर 18 विभागांनी 80 टक्क्यांहून अधिक उद्दिष्टे साध्य केली आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. दहा विभागांनी 60 ते 79 टक्क्यांदरम्यान उद्दिष्टे साध्य केली आहेत, तर आठ विभागांनी 60टक्क्यांपेक्षा कमी उद्दिष्टे साध्य केली आहेत, असे ते म्हणाले.   

गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील. सविस्तर माहिती तुम्हाला www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

    या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, असंही फडणवीसांनी आपल्या X वर म्हटलं आहे. 

    100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे....

    - 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,  

    - ⁠5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,

    - ⁠5 जिल्हाधिकारी, 

    - ⁠5 पोलिस अधीक्षक, 

    - ⁠5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), 

    - ⁠4 महापालिका आयुक्त, 

    - ⁠3 पोलिस आयुक्त, 

    - ⁠2 विभागीय आयुक्त आणि 

    - ⁠2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक 

    यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

    या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.