जेएनएन, मुंबई. Maharashtra Din: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला सातत्याने पुढे नेण्याचा निर्धार आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचा संकल्प आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे, असा निर्धार आणि निश्चय महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करत असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह राज्याच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - Maharashtra Din 2025: राज्याने स्थापनेपासून अशी केली सर्वच क्षेत्रात प्रगती, जाणून घ्या 65 वर्षांचा आढावा
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी कार्यरत अधिकारी, कर्मचारी व पोलीस दलातील अधिकारी, जवान उपस्थित होते.