मुंबई - Maharashtra Local Body Election : राज्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीची समन्वय समिती मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीत महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवायच्या की स्वतंत्रपणे, यावर निर्णायक चर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले की, तळागाळातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पूर्णपणे सज्ज झाला आहे. आता राज्य व जिल्हास्तरावर महायुती म्हणून कोणत्या पद्धतीने सामोरे जायचे, हे पुढील दोन दिवसांत ठरवले जाईल. त्यासाठी मंगळवारी समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली आहे.

महायुतीचा निर्णय मंगळवारी ठरणार-

तटकरे म्हणाले, आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर समन्वय समितीची बैठक होईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका महायुती म्हणून लढायच्या का, यावर चर्चा होईल आणि त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या तीन घटक पक्षांदरम्यान समन्वय राखून निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

 रायगडमध्ये ‘वेट अँड वॉच’ची भूमिका-

    शिवसेनेच्या रायगडमधील भूमिकेबाबत बोलताना तटकरे म्हणाले, शिवसेनेचे काही आमदार आणि पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीसोबत युती नको असे म्हटले आहे. मात्र राष्ट्रवादीने अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. सध्या आम्ही ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आहोत. योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल.