मुंबई. Maharashtra Weather Update Today:  महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीसाठी पोषक हवामान तयार होऊ लागले आहे. राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी होत असतानाच आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ची सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

देशातूनही मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या बहुतांश भागातून माघार घेतली आहे. 29 सप्टेंबर रोजी मान्सूनच्या परतीची सीमा कायम होती. आता पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या आणखी काही भागांतून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सून पूर्णपणे परतण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. 

महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम

मान्सून परतीच्या मार्गावर असला तरी महाराष्ट्रातील वातावरण पूर्णपणे कोरडे झालेले नाही. समुद्राकडून येणारे वारे, स्थानिक वातावरणातील आर्द्रता आणि तापमानातील वाढ यामुळे काही भागांत ढगांची निर्मिती होऊन मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे.सध्या हवामान विभागाच्या ३० सप्टेंबरच्या उपखंडनिहाय इशाऱ्यानुसार कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रासाठी 1ते 6 ऑक्टोबरदरम्यान कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे पाऊस व्यापक किंवा मुसळधार स्वरूपाचा नसून स्थानिक स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. 

तापमानात वाढ होण्याची शक्यता

पावसाचे प्रमाण कमी होताच राज्यातील अनेक भागांत दिवसाच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. आकाश निरभ्र राहिल्यास सूर्यकिरणांचा प्रभाव वाढून दुपारच्या वेळी उकाडा जाणवू शकतो. त्यामुळे आगामी दिवसांत दिवसाचे तापमान वाढण्याबरोबरच दमट उकाड्याचाही अनुभव येण्याची शक्यता आहे.

    ऑक्टोबर महिन्यात मान्सूनचा प्रभाव कमी होत असताना सूर्याची तीव्रता वाढते. त्यामुळे सकाळी आणि रात्री तुलनेने आल्हाददायक वातावरण असले तरी दुपारी उन्हाचा चटका जाणवतो. यालाच सर्वसाधारणपणे ‘ऑक्टोबर हिट’ म्हटले जाते.

    परतीच्या मान्सूनचा प्रवास महत्त्वाचा

    भारतीय हवामान विभागाच्या निकषांनुसार मान्सूनच्या परतीसाठी केवळ पाऊस थांबणे पुरेसे नसते. संबंधित भागात सलग पाच दिवस पावसाची अनुपस्थिती, खालच्या वातावरणात प्रतिचक्रीवादळाची स्थिती आणि वातावरणातील आर्द्रतेत लक्षणीय घट अशा बाबींचाही विचार केला जातो. देशातून मान्सूनची संपूर्ण माघार साधारणपणे 1 ऑक्टोबरनंतरच्या वातावरणीय स्थितीनुसार निश्चित केली जाते.

    त्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पाऊस आणि वाढता उकाडा असे दोन्ही चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.  तर राज्याच्या इतर भागांत आकाश अंशतः ढगाळ   वातावरण राहून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.