जेएनएन, मुंबई. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, राज्यातील विविध भागांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात सध्या उन-पावसाचा खेळ सुरू असून अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामानातील बदलामुळे कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांना यलो अलर्ट 

हवामान विभागाने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत मध्यम ते जोरदार पावसासह काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यासाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही भागांत जोरदार सरी कोसळू शकतात. 

    विदर्भ आणि मराठवाड्यावरही पावसाचे सावट

    विदर्भातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे. 

    नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन 

    हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसाच्या काळात नदी-नाले, धबधबे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे. तसेच जोरदार वाऱ्यांमुळे झाडे किंवा कमकुवत संरचनांपासून दूर राहावे. वाहनचालकांनी कमी दृश्यमानतेमुळे सावधगिरीने वाहन चालवावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. 

    राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे काळजी पूर्वक लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.