जेएनएन, मुंबई. Weather Update Today : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असला तरी काही भागात उन्हाचा चटका अद्याप कायम आहे. मात्र हवामान खात्याने आजपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसात राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज -

मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आजपासून मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात जाणवणार आहे.

घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता जास्त -

या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण आणि घाटमाथा भागात पावसाची तीव्रता जास्त राहणार आहे. विशेषतः ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत आजपासून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता -

    हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता, वाहतुकीत अडथळे आणि समुद्रकिनाऱ्यावर उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.