जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update Today : महाराष्ट्रात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, नागपूर, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस मुंबईत हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी भागात रिमझिम ते मध्यम पाऊस अपेक्षित असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातही ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह सरी कोसळू शकतात. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरण्याची शक्यता आहे. खरीप पिकांच्या वाढीला मोठी चालना मिळणार आहे.दरम्यान, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी नद्या, ओढे आणि नाले तुडुंब भरले असून, खालच्या भागात पाणी साचल्याच्या तक्रारीही समोर आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.तर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

मराठवाड्यात पिकांचे प्रचंड नुकसान -

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. परभणी, हिंगोलीसह छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, बीड, धाराशीव या भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.  कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मका, डाळींब, द्राक्ष यासारख्या पिकांवर पावसाचा गंभीर फटका बसला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कंबर मोडली असून, उभ्या हंगामाचे मोठे नुकसान झाल्याची परिस्थिती आहे.