मुंबई (एजन्सी) - अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने 1,356.30 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. या मदतीचा थेट फायदा 15,16,681 हेक्टर नुकसान झालेल्या शेती जमिनीतील 21,66,198 बाधित शेतकऱ्यांना होईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्याने 1,356.30 कोटी रुपयांच्या मदतीला मंजुरी देऊन एक निर्णायक पाऊल उचलले आहे, ज्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळेल याची खात्री झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तसेच पशुधन किंवा घराचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे अधिकार जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे मंत्री म्हणाले.
कोणत्या जिल्ह्याला किती मदत?
जिल्हा प्रशासनाला अधिकार देऊन, विलंब टाळला - बीडला 577.78 कोटी रुपये, धाराशिवला 292.49 कोटी रुपये, लातूरला 202.38 कोटी रुपये, परभणीला 245.64 कोटी रुपये, नांदेडला 28.52 कोटी रुपये, सातारा 6.29 कोटी रुपये आणि कोल्हापूरला 3.18 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे मंत्री जाधव यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्याला नुकसानीच्या प्रमाणात निधी वाटप करण्यात आला आहे आणि त्याचे वितरण आधीच सुरू झाले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.