जेएनएन, मुंबई. लोकनेते शहीद विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष विजय वाकोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षाचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
‘भाजपा संविधानच संपवायला निघाले’
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला अभिप्रेत असा भारत उभा करण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे परंतु भाजपा मात्र हे संविधानच संपवायला निघाले आहे.
मनुवादी व संविधानवादी अशा दोनच जाती आहेत, तोडा फोडा व राज्य करा ही भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची निती आहे तर काँग्रेस पक्ष मात्र सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. एकिकडे संविधान संपवण्याचे प्रयत्न सुरु असताना हे संविधान अबाधित ठेवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी परभणीत येऊन या कुटुंबियांची भेट घेतली.
आंबेडकरी समाजावर अत्याचार झाला तर…
आंबेडकरी समाजावर अत्याचार झाला तर काँग्रेस पक्ष खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे राहिल हा संदेश राहुल गांधी यांनी दिला आहे.
राज्यघटना घराघरात पोहचवली
राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राज्यघटना घराघरात पोहचवली. भाजपा सरकार राज्य घटनेनुसार काम करत नाही हेही राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची लढाई काँग्रेस पक्ष व राहुल गांधी लढत आहे आणि जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे रहा, असे आवाहन खासदार हंडोरे यांनी केले.
यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा, प्रदेश काँग्रेसचे सचिव मुजाहिद खान, परभणी शहर जिल्हा अध्यक्ष नदीम इनामदार, सुहास पंडित आदी उपस्थित होते.