मुंबई. Maharshtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत निर्णयप्रक्रियेत मोठा बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापुढे संघटनात्मक आणि महत्त्वाचे राजकीय निर्णय एखाद्या-दुसऱ्या नेत्याच्या पातळीवर न घेता सामूहिक पद्धतीने घेण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटी आणि विस्तारित कोअर कमिटीच्या नियमित बैठका घेऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचे ठरले आहे.

पक्षातील निर्णयप्रक्रियेत अधिक समन्वय आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने हे बदल केले जात असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार पक्षाच्या कार्यपद्धतीत काही बदल सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र, निर्णयप्रक्रिया सामूहिक झाली तरी अंतिम निर्णयाचा अधिकार पवार कुटुंबीयांकडेच राहणार, अशी भूमिका पक्षाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर पक्षरचनेत बदल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वात आणि संघटनात्मक रचनेत अनेक बदल झाले. या बदलांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. नेतृत्वाची नवी रचना, विविध पदांची जबाबदारी आणि महत्त्वाचे राजकीय निर्णय कोणत्या पद्धतीने घेतले जाणार, यावरून पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले होते.

या पार्श्वभूमीवर आता निर्णयप्रक्रियेला संस्थात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे. एकाच नेत्यावर किंवा मोजक्या नेत्यांवर निर्णयाची जबाबदारी राहण्याऐवजी कोअर कमिटीमध्ये चर्चा करून निर्णय घेण्याची पद्धत अवलंबण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

पटेल-तटकरे यांच्या भूमिकेवर चर्चा

    दरम्यान, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबतही राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात चर्चा सुरू होती. पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेत कोणाला कोणती जबाबदारी मिळणार, यावरूनही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले होते.

    विशेषतः सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या पक्षरचनेच्या कागदपत्रांमध्ये पटेल आणि तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याचे समोर आल्याने या चर्चेला आणखी वेग आला. त्यामुळे पक्षातील जुन्या नेतृत्वाची भूमिका काय राहणार आणि नव्या नेतृत्वाच्या काळात निर्णयप्रक्रिया कशी असेल, हा प्रश्न उपस्थित झाला.

    पवार कुटुंबीय विरुद्ध पटेल-तटकरे?

    याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबीय विरुद्ध प्रफुल पटेल-सुनील तटकरे असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पक्षातील अनुभवी नेत्यांचा प्रभाव आणि पवार कुटुंबीयांच्या नेतृत्वातील नव्या व्यवस्थेचा समतोल कसा साधला जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

    मात्र, आता सामूहिक निर्णयप्रक्रियेचा अवलंब करून हा संभाव्य संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मानले जात आहे. कोअर कमिटीमध्ये सर्व प्रमुख नेत्यांना स्थान देऊन महत्त्वाच्या राजकीय आणि संघटनात्मक निर्णयांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

    पार्थ पवारांच्या प्रभावाचीही चर्चा

    पक्षातील काही निर्णयांवर खासदार पार्थ पवार यांचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा यापूर्वी पक्षांतर्गत वर्तुळात झाली होती. त्यामुळे निर्णय कोणत्या पातळीवर आणि कोणाच्या सल्ल्याने घेतले जातात, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते.

    आता सामूहिक निर्णयप्रक्रिया सुरू केल्यास अशा प्रकारच्या चर्चांना आळा घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पक्षातील विविध नेत्यांचा सहभाग वाढवून निर्णय घेतल्यास संघटनेत समन्वय निर्माण करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.