मुंबई. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. एका मोठ्या राजकीय घडामोडीत, शिवसेनेचे (UBT) सहा खासदार - संजय हरिभाऊ जाधव, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, ओमप्रकाश भूपालसिंग निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय उत्तमराव देशमुख, आणि नागेश बापूराव पाटील आष्टीकर - यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत औपचारिक प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (यूबीटी) फूट पडण्याच्या वाढत्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर हे नाट्यमय पाऊल उचलण्यात आले असून, महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला हा एक मोठा धक्का आहे. ठाकरे यांनी बोलावलेल्या अलीकडील संसदीय पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित असलेले बंडखोर खासदार, आता सत्ताधारी शिवसेना गटात सामील झाले आहेत.

शिंदेंनी 6 खासदारांचे केले कौतुक -


एकनाथ शिंदेंनी प्रवेश केलेल्या सहाही खासदारांचे कौतुक करत त्यांची वैशिष्ट्ये सांगितली:

संजय दिना पाटील: हा दीनांचा कैवारी असून मुंबईत त्यांची मोठी ताकद आहे.

बंडू जाधव: लोकांची आणि मतदारांची नाळ घट्ट जोडलेला हा नेता आहे.

    ओमराजे निंबाळकर: हे तर जनतेच्या मनाचे राजे आहेत.

    नागेश अष्टीकर: हे आमचे 'ओपनिंग बॅट्समन' आहेत, जे बिनधास्त आहेत. कोणाच्या अध्यात-मध्यात जात नाहीत, पण वाटेला गेल्यास 'नागेश' नाव आहे हे विसरू नका.

    यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही ना कोणाला तुडवायला, ना आडवायला आलोय, आम्ही तर शिवसेना वाढवायला आलोय. शिवसेना एक परिवार आहे. या परिवारामध्ये सहा नवीन खासदार सामील झाले असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यांच्या मतदारसंघातील कामे मार्गी लावली जातील. येथे कोणीही मालक नाही, सर्वजण कार्यकर्ते आहेत, या खासदारांच्या विश्वासाला तडा कधीही जाऊ देणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.