जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics News: शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदी एकनाथ शिंदे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सोबतच आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार एकनाथ शिंदेकडे देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्य नेतेपदी फेरनिवड
माजी खासदार राहुल शेवाळे यांनी शिंदे यांची मुख्य नेतेपदी फेरनिवड करण्याचा ठराव मांडला होता. पक्षाच्या पदाधिकारीने सर्वानुमते हा ठराव मंजूर करत शिंदे यांची पक्षाध्यक्षपदी निवड केली आहे. मुख्यनेतेपदी फेरनिवडीबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना बहाल करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
मुख्यपक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर शिंदे म्हणाले की, कमी बोलून जास्त काम करण्याचे ध्येय ठेवू, ते पक्षासाठी आणि नेत्यासाठी चांगले आहे. विरोधकांचा पर्दाफाश करताना स्वतःउघडे होऊ नका असा सल्ला ही पदाधिकारी आणि नेत्याला शिंदे यांनी दिला.
तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढे मोठे यश मिळविले, ते चुकीचे बोलून घालवू नका. शिस्तीला तडा जाईल, असे कुठलेही काम करू नका, जास्त ऐका, कमी बोला असा कानमंत्र शिंदे यांनी दिला. पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी सर्वांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.
शिंदेला भाजपसोबत वाटाघाटीचे सर्व अधिकार
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षासोबत जागा वाटाघाटीचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना एकमताने देण्यात आले आहे.