जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये अंतर्गत शिस्तभंगाच्या मुद्द्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पक्ष प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांना त्यांच्या पदावरून हटविण्याचा निर्णय पक्षप्रमुख अजित पवार यांनी घेतला आहे. या दोघांच्या सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर अखेर पक्ष नेतृत्वाने कठोर पाऊल उचलले आहे.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत!
गेल्या काही दिवसांत दोन्ही प्रवक्त्यांनी माध्यमांसमोर आणि सोशल मीडियावर केलेली वादग्रस्त वक्तव्यं मोठ्या चर्चेत आली होती.
अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी सरकारच्या धोरणांवर आणि मंत्र्यांवर टीका करताना पक्षाच्या भूमिकेशी विसंगत मत व्यक्त केले होते. तर रुपाली पाटील ठोंबरे यांनी शेतकरी आंदोलने आणि महिला आरक्षण या विषयावर केलेल्या विधानांमुळे पक्षात गोंधळ आणि असंतोष निर्माण झाला होता.
या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना अनेकदा स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यामुळे अखेर अजित पवारांनी “शिस्तभंग कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही” असा स्पष्ट संदेश देत ही कारवाई केली.
पक्षाची अधिकृत भूमिका!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की “पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम करणाऱ्या नेत्यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडणे अपेक्षित असते. परंतु काही वक्तव्यांमुळे गैरसमज निर्माण होऊन पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांना प्रवक्तेपदावरून मुक्त करण्यात येत आहे.
