जेएनएन, मुंबई. आम्ही सत्तेचा गैरवापर कधी केला नाही... आम्ही सत्तेचा गर्व कधी केला नाही...कारण सत्तेचा गैरवापर जास्त काळ टिकत नसतो. आम्ही जनतेची कामं करतोय म्हणून जनता आणि प्रत्येक समाजघटक आम्हाला 8- 8 लाखाच्या फरकाने निवडून देतात. या जनतेमुळे आणि कार्यकर्त्यांमुळेच आम्ही निवडून येतो अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आष्टी - पाटोदा - शिरुर मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे केला.
अजित पवारांचं आवाहन
नुसतं राजकारण करुन आपलं पोट भरणार नाहीय हे लक्षात घ्या. ज्या - ज्या योजना केंद्र व राज्यसरकार आणत आहे त्याचा लाभ गरीब लोकांना करुन द्या. त्यांच्या चेहर्यावर समाधानाचे वातावरण दिसले पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला
मी चांगल्याच्या पाठीमागे माझी संपूर्ण ताकद उभी करेन पण चुकीचं करून पदरात घ्या म्हणाल तर जमणार नाही. चूक करुन पदरात घ्या म्हणाल पण आता पदर पार फाटून गेला आहे. त्यामुळे आता तसं काही सांगू नका असा सबुरीचा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
कोरोना आला त्यावेळी वैद्यकीय क्षेत्र किती महत्वाचे आहे हे समजले आणि त्यातून आम्ही पायाभूत सुविधा केंद्र व राज्यशासनाच्यावतीने उभ्या केल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेतला आहे एक हजार कोटी रुपये खर्चून अंबाजोगाईत मेडिकल कॉलेज उभारण्यात आले आहे. आता पालघर, जालना, वाशिमलादेखील मेडिकल कॉलेज देणार आहे. कॅन्सर हॉस्पिटल काढण्यासाठी भीमराज धोंडे आपण सूचना केली आहे. माझ्या कार्यालयातील ढाकणे व भोसले यांना याठिकाणी लक्ष घालण्यास सांगितले आहे. सीएसआरच्या माध्यमातून या हॉस्पिटलला सहकार्य करु असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले.
अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत
आज आष्टी - पाटोदा - शिरुर मतदारसंघातील जे पदाधिकारी प्रवेश करत आहेत त्यांना बळ देण्याचे काम केले जाईल. त्यांचा मान - सन्मान राखला जाईल असे सांगतानाच त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनापासून स्वागत केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सर्व घटकांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि यापुढेही राहिल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
