जेएनएन, मुंबई. Maharashtra Political News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याचा दावा करत त्यांनी ग्राहकांना 100 टक्के शुद्ध पेट्रोल आणि इथेनॉलमिश्रित पेट्रोल असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने इंधन आयात कमी करणे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या उद्देशाने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या धोरणाचा वाहनधारकांवर प्रत्यक्ष परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याची अनेक ग्राहकांची तक्रार आहे. परिणामी, वाहनधारकांना अधिक इंधन खर्च करावा लागत असून त्याचा आर्थिक भार वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

100 टक्के पेट्रोलचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून द्यावा

ठाकरे यांनी सरकारने या विषयावर पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळले आहे, याची स्पष्ट माहिती प्रत्येक पेट्रोल पंपावर ग्राहकांना मिळावी, तसेच ज्यांना शुद्ध पेट्रोल वापरायचे आहे त्यांच्यासाठी 100 टक्के पेट्रोलचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी पत्रात सुचवले आहे. 

याशिवाय, इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वाहनांच्या इंजिनवर, देखभाल खर्चावर आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामांचा स्वतंत्र अभ्यास सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ग्राहकांच्या हिताचा विचार करून इंधन धोरणात आवश्यक बदल करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी देशभरात टप्प्याटप्प्याने इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलचा वापर वाढविण्यात येत आहे. सरकारच्या मते, यामुळे कच्च्या तेलावरील आयात कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध होईल. मात्र, वाहनांचे मायलेज आणि ग्राहकांच्या खर्चाबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.