जेएनएन, मुंबई. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना दिवाळीनिमित्त मोफत साडी देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ राज्य सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक चणचणीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भात शासन निर्णय (GR) जारी केला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत लाभार्थी महिलांना मोफत साड्यांचे वितरण होणार नाही.

दरम्यान लाडकी बहीण योजनेतून सुमारे 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. 

2023 मध्ये झाली होती सुरुवात 

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना दरवर्षी दिवाळीनिमित्त एक मोफत साडी देण्यात येत होती.

सलग तीन वर्षे लाभ 

या योजनेसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत होती. 2023, 2024 आणि 2025 या सलग तीन वर्षांत लाभार्थींना साड्यांचे वितरण करण्यात आले. मात्र, वाढता आर्थिक ताण आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 

    यंदा दिवाळीत साड्यांचे वितरण नाही 

    शासन निर्णयानुसार, 2026 मध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाणार नाही. परिणामी, यंदाच्या दिवाळीत अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी मिळणार नाही.