जेएनएन, मुंबई: दिल्लीतील स्फोट प्रकरणानंतर देशभरातील प्रमुख धार्मिक स्थळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख श्रद्धास्थानं शिर्डी येथील साईबाबा मंदिर आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, शेगाव गजानन महाराज मंदिर, पुणे येथील दगडूशेठ मंदिराची सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.
राज्य गृहविभाग आणि पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली आहे. वाढत्या गर्दीचा विचार करता, सुरक्षा यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिर्डी साईबाबा मंदिरातील सुरक्षा व्यवस्था
- शिर्डी साईबाबा संस्थान हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
- दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात.
- दिल्लीतील घटनेनंतर शिर्डी पोलिसांनी मंदिर परिसरात सुरक्षेचा कडा घट्ट केला आहे.
- मंदिर परिसरात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय करण्यात आले आहेत.
- बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉडकडून तपासणी केली जात आहे.
- भाविकांच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर तपासणी सक्तीची करण्यात आली आहे.
- पोलिस व होमगार्डचे अतिरिक्त जवान रात्रंदिवस गस्त घालत आहेत.
- संशयास्पद वस्तू वा व्यक्ती आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई सिद्धिविनायक मंदिरातील सुरक्षा वाढवली :
- मुंबईच्या प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात देखील सुरक्षा यंत्रणांनी मोठी तयारी केली आहे.
- मुंबई पोलिस, स्थानिक बीडीयस पथक आणि क्यूआरटी (Quick Response Team) तैनात करण्यात आली आहे.
- मंदिर परिसरात बॅग तपासणी, वाहन तपासणी आणि सतत गस्त सुरू आहे.
- गर्दीच्या वेळी एनएसजी व राज्य राखीव पोलीस दल सज्ज ठेवले जात आहेत.
- मंदिर व्यवस्थापनानेही भाविकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील इतर धार्मिक स्थळांवरही अलर्ट
शिर्डी आणि सिद्धिविनायकसह शेगावचा गजानन महाराज मंदिर, पुण्यातील दगडूशेठ गणपती, तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख देवस्थळांवरही सतर्कता वाढवण्यात आली आहे.
पोलिस प्रशासनाने सांगितले की, “ही फक्त खबरदारीची उपाययोजना आहे. कोणताही धोका नाही; मात्र नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती द्यावी.”
