जेएनएन, मुंबई. Maratha Reservation Controversy: राज्यात सुरू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ओबीसी संघटनांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी बोलावली बैठक
राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासकीय निर्णयामुळे (जीआर) ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येऊ शकते, अशी भीती ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे. याच संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही बैठक बोलावली आहे. नागपुरात रविवारी झालेल्या बैठकीनंतर या पुढील वाटचाल म्हणून मुंबईतील ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या संघटनांचे पदाधिकारी राहणार उपस्थित
बैठकीत सरकारचा जीआर रद्द करण्याची मागणी, कायदेशीर लढाईचे पर्याय, तसेच राज्यव्यापी आंदोलनाची आखणी यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आंदोलने तीव्र होण्याची शक्यता
ओबीसी समाजाचा आरक्षणातील हक्क अबाधित ठेवण्यासाठी पुढील धोरण ठरवणारी ही बैठक असून, यानंतर आगामी काही दिवसांत आंदोलने तीव्र करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.