जेएनएन, मुंबई. Maharashtra Latest News: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचे अभिनंदन केले. वैभवी देशमुखला बारावी परीक्षेत 85 टक्के गुण मिळाले असून, याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून तसेच दूरध्वनीद्वारे संवाद साधून वैभवीचे अभिनंदन केले.
पुढील शिक्षणासाठी तुला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही तुझ्या कायम पाठीशी असल्याचे देखील म्हटले. यावेळी वैभवीने वडिलांचे स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेल, तुम्ही सगळे सोबत आहात, त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मदत होईल, असे म्हणत माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांनी न्याय नक्कीच मिळेल असे देखील म्हटले.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने यंदा बारावीची परीक्षा दिली. ती बारावी उत्तीर्ण झाली असून तिला 85.11 टक्के मिळाले आहेत. तिला भौतिकशास्त्रात 83, रसायनशास्त्रात 91, जीवशास्त्रात 98 व गणितामध्ये 94 गुण मिळाले असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - Maharashtra 12 Result 2025: संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने 12 वीत मिळवलं घवघवीत यश, घेतले 85 टक्के
बारावीचा 91.88 टक्के निकाल
दरम्यान, काल बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,97,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 91.88 आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के इतका सर्वाधिक आहे.