जेएनएन, मुंबई. अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी असून उद्ध्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

तर, सरकारने सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी व आश्वासन पाळून कर्जमाफी करावी अशी मागणी त्यांनी केली. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली आज पनवेल येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत संविधान संवाद यात्रा काढण्यात आली. त्यानंतर पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित 'कामगार मेळावा आणि संविधानाचा जागर 2025' या कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संवाद साधला.

हे सरकार फक्त मुठभर धनदांडग्यांचे

राज्यातील 30 जिल्ह्यातील जवळपास 300 तालुक्यात अतिवृष्टी व महापूराने थौमान घातले आहे. सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 5 लाख रुपये व कर्जमाफी करावी अशी मागणी केलेली असताना सरकारने मात्र शेतकऱ्यांना वाटाण्याचा अक्षता लावल्या आहेत. हे सरकार शेतकरी व गोरगरिब जनतेचे नसून फक्त मुठभर धनदांडग्यांसाठी आहे हे पुन्हा दिसून आले आहे असे सपकाळ म्हणाले.  

    पंतप्रधान नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार का?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येत असून नवी मुंबई विमानतळाचे ते उद्घाटन करणार आहेत. या विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे, पण सरकारने अद्याप नाव दिले नाही. तर महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले असताना देशाच्या पंतप्रधानांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही, नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी तरी ते करतील काय?, असा सवाल सपकाळ यांनी यावेळी केला.