जेएनएन, मुंबई. अंगणवाडीतील बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दरमहा देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषात सुधारणा करण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

राज्यात 110,664 अंगणवाड्या असून 1,08,627 अंगणवाडी सेविका आणि 1,05,470 अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्याना दरमहा प्रोत्साहन भत्ता दिला जातो. या भत्त्याच्या निकषांमध्ये सर्वसमावेशकता, सुसूत्रता यावी तसेच अधिकाधिक सेविका आणि मदतनीस यासाठी पात्र ठराव्यात यासाठी निकषांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेतील समितीने घेतला आहे.

अंगणवाडी केंद्रांसाठी निर्धारित 10 निकषांपैकी किमान 7 निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अनुक्रमे 1400, 700 प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तर सर्व 10 निकष पूर्ण केल्यास अनुक्रमे 2000, 1000 भत्ता देण्यात येणार आहे. 7 ते 10 दरम्यान निकष पूर्ततेनुसार भत्ता निश्चित करण्यात आला आहे. हे निकष नोव्हेंबर 2026 पासून लागू करण्यात आले आहेत.

याविषयी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्याच्या शहरी आणि अतीदुर्गम भागातही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहेत. अधिकाधिक सेविका आणि मदतनीस भत्त्यासाठी पात्र ठरून त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी निकषात सुधारणा करण्यात आल्या आहेत.