जेएनएन, मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे 14 निर्णय (Maharashtra Cabinet decision) घेण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना मिळणार 5 किलो अन्न
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्य्र रेषेखालील – डिबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या 33 जिल्ह्यातील 42 लाख 30 हजार 783 शेतकऱ्यांना पुढील तीन महिने पाच किलो मोफत धान्य देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. यासह आज झालेल्या बैठकीत इतर विविध विभागाच्या निणर्यांचा समावेश आहे.
सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्य्र रेषेखालील – डिबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या 33 जिल्ह्यातील 42 लाख 30 हजार 783 शेतकऱ्यांना पुढील तीन महिने पाच किलो मोफत धान्य मिळणार. माणशी तीन किलो तांदूळ, दोन किलो गहू या प्रमाणात धान्य मिळणार ( अन्न व नागरी पुरवठा विभाग)
- नंदूरबार जिल्ह्यातील नर्मदा तापी वळण योजनेसाठी 5 हजार 548 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता. सहा वळण बंधाऱ्यांचे नियोजन. यामाध्यमातून परिसरातील सुमारे 26 हजार 526 हेक्टरला सिंचनाचा लाभ तसेच 11.50 मे.वॅ. वीज निर्मिती होणार. (जलसंपदा विभाग)
- आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रीया जलद होणार. त्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापनेबाबत, व नव्वद दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा. त्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी.(गृह विभाग)
- महसूल विभागांतील अर्धन्यायिक कामकाजाकरिता महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली (रेव्ह्यन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम) लागू करण्यात येणार. तसेच या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एक जिल्हा एक अपील तरतूद लागू होणार. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी ( महसूल विभाग)
- आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी, एसईबीसी, ईडब्लूएस) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुधारित दराने भत्ता मिळणार. भोजन, निवास, निर्वाह भत्त्यात भरीव वाढ. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
- शालार्थ प्रणालीत समाविष्ट असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून देणार. आरबीआयकडे नोंदणीकृत संस्थाच्या माध्यमातून वित्तीय सुविधा उपलब्ध होणार. (शालेय शिक्षण विभाग)
- महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 32 (ब) आणि 53 (१अ) मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. याबाबतचे विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर करण्यास मंजुरी. या सुधारणेमुळे अभिनिर्णय फी, अपील भी यांच्या दरामध्ये सूसुत्रता येणार ( महसूल विभाग)
- कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ), रामटेक अधिनियम, 1997 आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, 1989 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती, वार्षिक अहवाल व लेखे यांच्या संदर्भातील परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यासाठी सुधारणा करणार. (उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग)
- खाजगी अनुदानित शाळांच्या विनियमनांसाठी सर्वसमावेशक असा कायदा होणार. त्यासाठी महाराष्ट्र खाजगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, 2026 या विधेयकाच्या प्रारुपास मंजुरी. विधेयक विधिमंडळात सादर करण्यास मंजुरी. (शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग)
- महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम 1969 व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम 1989 या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. ( कामगार विभाग)
- राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, 2021 (एनसीएएचपी कायदा, 2021) मधून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्यात येणार. याबाबतच्या आवश्यक सुधारणा करण्याच्या विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
- शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयामधील पूर्ण वेळ ग्रंथपालाप्रमाणेच आता खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदानित युनानी महाविद्यालयातील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग. वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सुधारीत वेतन संरचना लागू करण्यास मंजुरी. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अधिनियमातील तरतुदीसाठीच्या सुधारणेस मान्यता. त्याबाबतचा सुधारणा अधिनियम विधिमंडळासमोर मांडण्यास मंजुरी. (सामान्य प्रशासन विभाग)
- नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन देण्यास मान्यता. नगर पंचायतीसाठी प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)
हेही वाचा - Pune Firing News: पुण्यात खळबळजनक घटना! शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार; कोयत्याने केले सपासप वार
