जेएनएन, मुंबई: परतीच्या पावसामुळे राज्यभर निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये दिवाळी दरम्यान एसटीने केलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार ही हंगामी दरवाढ रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ रद्द

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी हंगामात (15 आक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. परंतु परतीच्या पावसामुळे आलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य जनतेला सोसावा लागणाऱ्या आर्थिक भाराचा विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर भाडेवाढ रद्द करावी अशी सुचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना केली. त्यानुसार मंत्री सरनाईक यांनी महामंडळाला दिलेल्या निर्देशानुसार महामंडळाने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरमध्ये भाडेवाढ

यापूर्वी जाहीर केल्यानुसार 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत साधी, निमआराम (हिरकणी), शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही आणि जनशिवनेरी अशा सर्व बसगाड्यांमध्ये 10 टक्के भाडेवाढ लागू होणार होती. परंतु, आता प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजावे लागणार नाही. त्यामुळे नेहमीच्या दरानुसार दिवाळीत देखील प्रवाशांना एसटीचे तिकीट काढणे शक्य होणार आहे.

कोट्यवधी प्रवाशांना दिलासा

    सणासुदीच्या काळात राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला 30 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार 10 टक्के दरवाढीचा निर्णय महामंडळाने घेतला  होता. पण  राज्यातील पूरपरिस्थिच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांवर होणारा परिणाम लक्षात घेता हंगामी भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. अर्थात,या निर्णयामुळे दिवाळी सणात एसटीने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.