जेएनएन, मुंबई. Almatti Dam Height अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात महाराष्ट्र सरकार आक्रमक झाले असून या प्रकरणात राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात सर्वपक्षीय 12 लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची 519 फूटावरून 524 फूट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, या उंचीवाढीमुळे महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे आज (सोमवार) दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांची स्वतंत्र बैठक होणार आहे.यानंतर केंद्रीयमंत्री सी आर पाटीलसोबत दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनीही लिहिले पत्र !
कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह कृष्णा नदीकाठच्या परिसराला महापुराचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे. या पत्रात अलमट्टी धरणाचे बॅक वॉटर, नदीमधील गाळ साचणे, बंधाऱ्यांचे बांधकाम यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिसरातील नागरिकांच्या व्यथा-वेदना मांडल्या आहेत.