मुंबई. राज्यातील महापालिका निवडणुकीत उमेदवारी आणि नाराजीनाट्याच्या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष प्रचारावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. मात्र, इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक ठिकाणी बंडखोरीचं चित्र निर्माण झालं आहे.

अनेक पक्षांमध्ये नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत बंडाचं शस्त्र उगारलं असून, यामुळे पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. विशेषतः सत्ताधारी महायुतीसह विरोधी पक्षांमध्येही अंतर्गत असंतोष उफाळून येताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर, अर्ज मागे घेण्यास अवघे काही तास शिल्लक असताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी उशिरापर्यंत मॅरेथॉन बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी नेमक्या उपाययोजनांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

बैठकीला पक्षातील वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी आणि काही महत्त्वाचे समन्वयक उपस्थित असल्याची माहिती आहे. बंडखोरांना समजूत काढण्यासाठी उमेदवारी माघारी घेण्याबाबत चर्चा, तसेच काही ठिकाणी पर्यायी तोडगा काढण्यावर भर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर महापालिका निवडणुकांचं चित्र अधिक स्पष्ट होणार असून, बंडखोरी कितपत आटोक्यात येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बंडखोरी कायम राहिल्यास अनेक महापालिकांमध्ये सरळ लढतीऐवजी त्रिकोणी अथवा चौरंगी लढती रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.